sagar
Joined: 11 Jun 2009
Posts: 7
Location: Kalyan
|
Posted:
Sun Jul 26, 2009 6:54 am |
  |
मुंबई, ठाणे, पुणे येथील काही गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या सोसायटीत सुरू केलेल्या वर्षां जलसंधारण प्रयोगाने या इमारतींना भेडसावणारी पाण्याची समस्या टळली आहे. घरात नळावाटे येणारे पाणी पिण्यासाठी व आंघोळीला वापरले आणि बोअरवेलचे पाणी शौचालयासाठी, बगिचामध्ये वापरले तर रोजची लाखो लिटर पाण्याची बचत होऊ शकते.
पाऊस जरा लांबला की आपल्याला आठवण होते ती कृत्रीम पावसाची आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची. नंतर पाऊस चांगला पडला आणि धरणातील पाण्याचा साठा वाढला की, लगेच पाणी बचतीचा सगळ्यांना विसर पडतो. मुंबई, ठाणे, कोकणात दरवर्षी दमदार पाऊस पडतो. मुंबईकरांना चिंता असते ती केवळ हा पाऊस मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पडतोय ना, याची.
१००-१५० किमी लांबीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील तलावांतून मुंबईकरांना वर्षभर पुरणारे पाणी मिळत असते. मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटीच्या वर गेल्याने पाण्याची मागणी वाढतच चालली आहे.
पाऊस कमी पडल्याने होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठय़ाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्व इमारतींना वर्षां जलसंधारण (रेनवॉटर हार्वेस्टिंग) सक्तीचे करण्याचा कायदा होऊनही त्याबाबत फारशी जागरुकता अद्याप दिसून येत नाही.
रेन वॉटर हार्वेस्टिंग पध्दतीमध्ये गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीखाली केलेल्या टाकीत साठवण्याबरोबरच इमारतीत असलेल्या बोअरवेलला (कूपनलिका) जिवंत ठेऊन जमिनीची पाण्याची पातळी वाढवण्याचे महत्वाचे काम केले जाते. बोअरवेलचे पाणी गाडी धुणे, शौचालयसाठी, कपडे-भांडी धुणे यासाठी वापरता येऊ शकते.
एरवी बिसलेरीची बाटली १२ रूपये लिटर दराने विकत घेणारा माणूस नळ एक मिनीट उघडा राहिला तर, काही क्षणात १२ लिटर पाणी फुकट घालवत असतो. चेन्नईलाही पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. त्यासाठी समुद्राचे पाणी शुध्द करून पुरवण्याचा एक प्रकल्प चेन्नईत सुरू आहे. या प्रकल्पातून गोडे पाणी मिळण्यासाठी प्रती लिटरला साधारण साडेचार रूपये खर्च येतो. अर्थात ही झाली भविष्यातील बाब. सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाचे पडणारे पाणी साठवले, जमिनीत जिरवले तर, वर्षभर हे पाणी पुरू शकते.
मुंबई, ठाणे, पुणे येथील काही गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या सोसायटीत सुरू केलेल्या वर्षां जलसंधारण प्रयोगाने या इमारतींनी भेडसावणारी पाण्याची समस्या टळली आहे. घरात नळावाटे येणारे पाणी पिण्यासाठी व आंघोळीला वापरले आणि बोअरवेलचे पाणी शौचालयासाठी, गाडय़ा धुण्यासाठी, बगिचामध्ये वापरले तर रोजची लाखो लिटर पाण्याची बचत होऊ शकते. बोअरवेलला वर्षभर पाणी लागेल याची खात्री अनेकांना नसते. पावसाचे पडणारे पाणीदेखील छतावरून, गच्चीवरून पडून फुकटच जाते. हे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग पद्धती अवलंबून साठवल्यास पावसाळ्यात त्याचा वापर तर करता येतोच, शिवाय बोअरवेलची पाण्याची क्षमता वाढविता येते. जमिनीखालील पाण्याची पातळी (वॉटर टेबल लेव्हल) वाढविणे फार महत्त्वाचे आहे.
पृथ्वीवर उपलब्ध पाण्यापैकी ९८ टक्के पाणी समुद्राचे खारे पाणी आहे, तर एक टक्का पाणी पिण्यासाठी वापरले जाते. ज्या काही एक टक्का शुद्ध पाण्यावर मानवजात जगते, ते पावसाचे साठवलेले पाणी असते.
शहरात राहणाऱ्या व्यक्तीस प्रतिदिन साधारणत: १३५ लिटर पाणी लागते. दिवसभरात पिण्यासाठी तीन लिटर, जेवणासाठी चार लिटर, आंघोळीला २० लिटर, शौचालयात ४० लिटर, कपडे धुवायला २५ लिटर, भांडी घासायला २० लिटर, तर झाडांना, बगिचामध्ये २३ लिटर असे सरासरी १३५-१४० लिटर पाणी एक व्यक्ती वापरते. अरब देशांप्रमाणे पाण्याचा पुनर्वापर करण्याचे प्रकल्प आपल्याकडे फारसे नसल्याने एकदा पाणी ओतले की, ते सरळ गटारातून खाडी, समुद्रात जाते. शौचालयासाठी सर्वात जास्त पाणी वापरले जाते. हे पाणी वाचवले गेले तरी यंदासारखी धरणे रिकामी होऊन पाणी टंचाईचे संकट उभे राहणार नाही.
अनेक गृहनिर्माण संस्थांना गार्डनिंग, शौचालयासाठी सोसायटी आवारात बोअरवेल खोदून ते पाणी पुरविले जाते. पावसाचे पडणारे पाणी मोठय़ा टाकीत साठवणे, तसेच जेथे कूपनलिका आहे, त्या ठिकाणी पावसाचे वाया जाणारे पाणी साठवून जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविली तर कूपनलिकांनादेखील वर्षभर पाणी मिळू शकते. रेनवॉटर हार्वेस्टिंगसंदर्भात पुणे, ठाणे येथील महापालिकांनी जेवढी आस्था दाखवली, तेवढा मुंबईत मात्र याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
ठाणे महापालिकेने ३१ जून २००७ रोजी ठराव करून नवीन निवासी, वाणिज्य बांधकामांना रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केले, तर २००० पूर्वीच्या जुन्या इमारतींनी ही पद्धती अवलंबिल्यास मालमत्ता करात पाच टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येईल, असे जाहीर केले.
रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना काही गृहनिर्माण संस्थांनी सुरू करून घेतली. ठाण्यातील काही संस्थाही याबाबत मार्गदर्शन करतात. एकदाच खर्च करून पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी मात या पद्धतीद्वारे करता येते. घराच्या, इमारतीच्या, छतावर, गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी पाइपद्वारे एकत्र करून ते पाणी साठविण्याच्या टाकीत, तसेच जेथे कूपनलिका आहे, तिच्या बाजूने जमिनीत सोडले जाते. सोसायटीमधील कुटुबांची संख्या जितकी असेल त्याप्रमाणे पाणी साठवण क्षमता वाढविली जाते.
ठाण्यातील माजिवडा येथील ऋतू एनक्लेव्ह, हॅपी व्हॅली, मित्तल पार्क (रघुनाथनगर), प्रेस्टीज पार्क, हार्मनी रेसिडन्सी, कॉसमॉस डेव्हलपर, सायप्रस कॉम्प्लेक्स- मुलुंड, विद्या प्रसारक मंडळ शाळा- मुलुंड, रुनवाल गार्डन सिटी, घोडबंदर रोड, ईडनवूड-गोदरेज, चाम्र्स हेरिटेज कल्याण, अमृतापाम कॉम्प्लेक्स कल्याण, गोदरेज हिल-कल्याण, जी कॉर्प आयटी पार्क ठाणे, गौरव कंटेनर वाडा, नॅशनल सोसायटी औंध-पुणे, रक्षक सोसायटी, सांगवी रोड- पुणे, सूर्य डेव्हलपर पाषाण- पुणे, यश डेव्हलपर- पाषाण, पुणे अशा अनेक प्रकल्पांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आला आहे. एकंदरीत असे प्रयत्न करण्याची गरज लोकांना हळुहळू जाणवू लागली आहे. आता अधिक जागरुकता येणे आवश्यक आहे.
शशिकांत कोठेकर (लोकसत्ता)
shashi421@gmail.com
--
--
Regards,
*.*.*.*.*.*.*.*.*..*.*.*.*.*.*.
۞ सागर रांजणकर ۞
*.*.*.*.*.*.*.*.*..*.*.*.*.*.*.
www.maimarathi.org
www.maimarathisanstha.ning.com
www.maimarathi.17.forumer.com |
|
|